पुणे

डीपीयूच्या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू विभाग सुरू

हृदयविकारग्रस्त बालकांवर होणार उपाचार


पुणे (प्रतिनिधी) , ता. १०: पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार असलेल्या लहान मुलांसाठी अत्याधुनिक पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू विभाग सुरू केला आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाने आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ सह सुसज्ज असा हा दहा खाटांचा विभाग हृदयविकारग्रस्त बालरूग्णांवर सर्वोत्तम उपचार देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आला आहे.
बजाज फिनसर्व्हच्या सी एस आर समितीच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम शक्य झाला असून, पुणे शहरातील बाल आरोग्य सेवा आणि बालरोगविषयक पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला आहे.

बजाज फिनसर्व्हच्या सी एस आर समितीच्या अध्यक्षा शेफाली बजाज तसेच त्यांचे पुत्र श्री. सिद्धांत बजाज, . डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनचे सुदिन आपटे; बजाज फिनसर्व्हच्या उपाध्यक्ष डॉ. शुभांगी बोचरे, यांच्या उपस्थितीत या विभागाचे उद्घाटन झाले. यावेळी हृदय शल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख आणि डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुराग गर्ग यांच्यासह सीव्हीटीएस टीम, वैद्यकीय व्यावसायिक, रुग्णालयातील कर्मचारी आणि अनेक मान्यवरही उपस्थित होते.

डॉ. अनुराग गर्ग यांच्या मते, विशेष केंद्रांच्या कमतरतेमुळे दरवर्षी केवळ १५ ते २० टक्के मुले जन्मजात हृदयविकारांवर उपचार घेऊ शकतात. रुग्णसंख्या आणि उपचारांची उपलब्धता यातील मोठी दरी दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा हा पुण्यातील अशा प्रकारचा पहिला विभाग आहे. येथे जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांसाठी प्रगत उपचार प्रदान केले जातील. डॉ. अनुराग गर्ग आणि सीव्हीटीएस टीमच्या नेतृत्वाखाली, हा विभाग जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. रुग्ण-केंद्रित काळजी आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असा हा विभाग हृदयाशी संबंधित गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लहान मुलांना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात आशावाद निर्माण करून, जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो.

डॉ.पी.डी. पाटील म्हणाले, “डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकिय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रामध्ये आम्ही नेहमीच गुणवत्ता आणि नावीन्यपूर्णतेसाठी नवे मापदंड स्थापित करण्यावर विश्वास ठेवला आहे. या प्रगत कार्डियाक युनिटचे उद्घाटन हे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे अद्ययावत पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयू मुलांचा जीव वाचवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांना सकारात्मक परिणाम देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकट करते.”

यावेळी डॉ. भाग्यश्री पाटील म्हणाल्या, “या कार्डियाक युनिटचे उद्घाटन करून आम्ही जे काही साध्य केले आहे, ती आमच्यासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. मुलांसाठी आणि गरजू रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणे हे सुनिश्चित करणे ही मोठी जबाबदारी आहे. येथे कुशल तज्ज्ञांची आमची टीम जागतिक दर्जाचे उपचार प्रदान करते, ज्यामुळे रुग्णांच्या कुटुंबांमध्ये आशेचा किरण निर्माण होईल आणि मुलांना उज्वल भविष्य मिळेल.”

डॉ.यशराज पाटील म्हणाले, “हे समर्पित बाल कार्डियाक सेंटर उभारण्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आणि परिवर्तनकारी आहे. हृदयविकार असलेल्या मुलांना सर्वोत्कृष्ट उपचार पुरविण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ते मूर्त रूप देते. या विभागाच्या रुपाने बालरोग आरोग्य सेवा प्रगत करण्यात अर्थपूर्ण योगदान दिल्याबद्दल आम्हाला समाधान आणि अभिमान वाटतो.”

डॉ. अनुराग गर्ग म्हणाले, “डीपीयू हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक बालरोग कार्डियाक आयसीयू विभागाचे उद्घाटन होत आहे, याचा आम्हाला आनंद होत आहे. उपलब्ध सुविधांपेक्षा हृदयशस्त्रक्रियेची गरज असलेल्या मुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यासारख्या समर्पित सुविधांची नितांत गरज आहे. डीपीयू हॉस्पिटल, बजाज फिनसर्व्ह आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीन यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या या विभागामुळे हृदयविकार असलेल्या आजारी बालकांना सर्वसमावेशक उपचार देणे शक्य होणार आहे. अशा मुलांना आपल्या देशाचे कार्यक्षम नागरिक बनण्यास सक्षम बनवण्यातही या विभागाचे मोठे योगदान असेल.”

पेडियाट्रिक कार्डियाक आयसीयूचे उद्घाटन बाल आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या डीपीयूच्या उद्दिष्टातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे मुलांना प्रगत, अत्याधुनिक उपचार उपलब्ध होतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button