
पुणे दि. १२ जाने २५ (प्रतिनिधी) टॉप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाउंडेशन (टीएमसीएफ) च्या सल्लागार मंडळाची बैठक पुणे विभागाचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जयभाये यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या वेळी टपाल सेवां मधील नवीनतम घडामोडी समजून घेण्यात आल्या तसेच टपाल खात्याची सेवा अधिक लोकाभिमुख करण्या साठी टीएमसीएफ च्या सदस्यां कडून उपयुक्त सूचना देखील करण्यात आल्या. टीएमसीचे उपाध्यक्ष आणि सरचिटणीस डॉ. जयसिंह पाटील यांनी गेल्या ४० वर्षां पासून टीएमसीएफ करत असलेल्या समाजोपयोगी व सेवाभावी कार्याची माहिती दिली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात विद्यार्थ्यांना टपाल सेवांच्या उपयुक्ततेची ओळख करून देण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारांची व उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना टपाल खात्याची माहिती करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी नवीन पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन काळानुरूप टपाल खात्यात होणाऱ्या डिजिटल बदलां बद्दल समाधान व्यक्त केले.
पीएमजी रामचंद्र जयभाये यांनी टपाल खात्याच्या संपूर्ण कामकाजाची विस्तृत माहिती दिली. त्यांनी पोस्ट ऑफिस द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या विविध सेवा आणि उत्पादनां बद्दल माहिती दिली. जयभाये यांनी पोस्ट खात्याच्या टपाल, वित्तीय, विमा, बँकिंग, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पार्सल इत्यादी सेवांची माहिती देऊन या सेवांचा जास्तीत जास्त प्रसार व उपयोग करण्याचे आवाहन केले.
हवाई वाहतूक तज्ज्ञ आणि टीएमसीएफ चे खजिनदार धैर्यशील वंडेकर यांनी हवाई वाहतूक व टपाल खात्याच्या घनिष्ठ नात्याची मनोरंजक माहिती दिली. भारता मध्ये नागरी हवाई वाहतुकीचा उदय हा वर्ष 1932 मध्ये खऱ्या अर्थाने प्रथमतः एअर मेल सेवे साठी सुरू झाल्याचे व नंतर हळू हळू एअर मेल घेऊन जाणाऱ्या विमानांमध्ये प्रवासी वाहतूक सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. टपाल खात्याचे महत्त्व सांगताना पूर्वीच्या काळात इंडियन एअरलाइन्स द्वारे खास टपाल खात्या साठी नागपूर मार्गे चालवल्या जाणाऱ्या नाईट एअर मेल सेवे बद्दल माहिती त्यांनी दिली. गेल्या 170 वर्षां पासून व संपूर्ण भारतात पसरलेल्या १ लाख ६५ हजार पोस्ट ऑफिसच्या विशाल नेटवर्क द्वारे लोकांना विश्वासार्ह व कार्यक्षम सेवा प्रदान करीत असल्या बद्दल वंडेकर यांनी सरकार, पोस्टल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
डीपीएस सिमरन कौर यांनी टीएमसीएफ सदस्य सुंदरी परचानी, माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट, रोमा, रामनिवास लड्ढा, स्मितेश शाह, शैलेश दिघावकर, नितीन पारिख, नरेश सिंघानी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व स्पष्टीकरण देऊन मिळालेल्या सूचनांची नोंद घेतली.
पीएमजी आर. जयभाये आणि डीपीएस सिमरन कौर यांच्या सह पीएमजी कार्यालयातून अविनाश पाखरे, एन.के. राऊत, शरद वांगकर, केतन शित्रे, नागेश डुकरे, मार्केटिंगचे अनिल आणि एस.डी. लोहकरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टीएमसीएफचे खजिनदार धैर्यशील वंडेकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ –
डावीकडून टीएमसीएफ चे उपाध्यक्ष डॉ. जयसिंह पाटील यांचे स्वागत करताना पीएमजी रामचंद्र जयभाये. इतर धैर्यशील वंडेकर व सिमरन कौर.