हाफकीन संस्थेबाबती आरोग्यमंत्री झिरवळ यांचे मोठे वक्तव्य
लवकरच चमत्कार दिसेल- झिरवळ
लोकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवळ हाफकीन संस्थेला देणार नवसंजीवनी
“पुढील सहा महिन्यांत चमत्कार दिसेल, हाफकीन संस्था नफ्यात आणणार” – श्री. नरहरी झिरवळ यांनी केले आश्वस्त
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची घेणार भेट
हाफकीन संस्था ही भारतातील एक प्रमुख बायोमेडिकल संस्था आहे. ही संस्था २०१७-१८ पर्यंत नफ्यात होती. मात्र २०१८-१९ पासून संस्थेला उतरती कळा लागली असून तोट्यात जात आहे. ही आरोग्य क्षेत्रातील आघाडीची संस्था असून कोरोना काळातही संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र संस्था तोट्यात जात असल्यामुळे संस्थेच्या भवितव्याबद्दल प्रश्न उपस्थित झाला असता अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवळ संस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तोट्यात चालणार्या संस्थेला नफ्यात आणण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे.
हाफकीन संस्थेचे वैशिष्ट्य असे की माफक दरात उत्कृष्ट दर्जाच्या आरोग्यवर्धक उत्पादनांची निर्मिती व पुरवठा केला जातो. या संस्थेची उत्पादने आशिया, अमेरिका, पॅन अमेरिका इ. जगाच्या ४५ देशांत निर्यात केली जातात. पोलिओ निर्मूलनासाठी संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची व आघाडीची भूमिका बजावली जाते. अशी प्रतिष्ठित संस्था तोट्यात जात असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवळ यांनी पुढाकार घेऊन संस्थेला नवसंजीवनी प्रदान करण्याची योजना आखली आहे.
याबाबत आपले मत व्यक्त करताना श्री. नरहरी झिरवळ म्हणाले की, “हाफकीन ही एक संस्था प्रतिष्ठित संस्था असून या संस्थेला आम्ही पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देणार आहोत. यासाठी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सकारात्मक चर्चा करुन यावर तोडगा काढला जाणार आहे. भविष्यात हाफकीन संस्था प्रगत संशोधन व प्रशिक्षण केंद्र बनवण्याच्या दृष्टीनेही पावले उचलली जाणार आहेत.”
“पुढील सहा महिन्यांत तुम्हाला चमत्कार दिसेल. तोट्यात जाणारी ही संस्था आम्ही नफ्यात आणणार आहोत.” असे आश्वासनही श्री. नरहरी झिरवळ यांनी दिले आहे. या नूतनीकरणाच्या माध्यमातून BSL-3 facility स्थापन केले तर Unicef च्या मागणीनुसार संस्थेला n-OPV लस निर्माण करता येईल. या प्रकल्पामुळे संस्थेची निर्यात क्षमता वाढून चांगला नफा प्राप्त होणार आहे. BSL-3 facility मुळे भविष्यात कोरोना सारख्या भयंकर विषाणूचा सामना करण्यासाठी संबंधित लस निर्माण करता येणार आहे. त्यामुळे श्री. झिरवळ यांनी उचललेले पाऊल लोककल्याणाचे असून भविष्यात संस्थेतर्फे मोठे प्रकल्प हाताळले जाण्याची योजना आखण्यात आली आहे. जेणेकरुन नागरिकांचे आरोग्य सुनिश्चित होऊन त्यांना चांगल्या जीवनशैलीचा लाभ घेता येईल.