पिं- चिं युनिव्हर्सिटीमध्ये क्रीडा महोत्सवाची सांगता
दिड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

पुणे, 24 फेब्रुवारी 2025 – पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी (PCU) ने आपल्या वार्षिक क्रीडा महोत्सव ‘क्रीडारंभ 2025’ च्या यशस्वी समारोपाची घोषणा केली. तीन दिवस चाललेल्या या भव्य क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व प्रमाणात सहभाग घेतला. 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे ‘क्रीडारंभ 2025’ हा PCU च्या इतिहासातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव ठरला आहे.
महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात क्रिकेटपटू रोहित मोटवानी, PCU कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी आणि प्रो-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांच्या उपस्थितीत पार पडले. या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, फूटसाल, व्हॉलीबॉल, कबड्डी यांसारख्या संघ खेळांबरोबरच कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस यांसारख्या वैयक्तिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य, रणनीतिक विचारसरणी आणि क्रीडास्पृहा यांचे दर्शन घडवले.
PCU कुलगुरू डॉ. मनीमाला पुरी यांनी याप्रसंगी भाष्य करताना सांगितले की, “क्रीडारंभ हा केवळ खेळांच्या स्पर्धेसाठी नसून विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास करणारे व्यासपीठ आहे. जिद्द, संघभावना आणि निरोगी स्पर्धेचा आत्मा या गोष्टी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. PCU क्रीडा संस्कृती वाढवण्यास कायम वचनबद्ध आहे.”
या कार्यक्रमात F.Y B.Tech विद्यार्थी श्री. कौस्तुभ भोसले याचा 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये (नवी दिल्ली, 2025) मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रो-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी या क्रीडा महोत्सवाने विद्यार्थ्यांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण केली असल्याचे सांगून पुढे नमूद केले की, “‘क्रीडारंभ 2025’ विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये, जिद्द आणि संघभावना प्रदर्शित करण्यासाठी उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देते. हा उत्सव विद्यापीठ समुदायाच्या एकजुटीचे प्रतीक आहे आणि विद्यार्थ्यांना संघभावना तसेच सहकार्याचे महत्त्व शिकवतो.”
PCU क्रीडा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रोतिभा नाथ बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ‘क्रीडारंभ 2025’ चे उत्कृष्ट नियोजन व समन्वय करण्यात आला.
हा भव्य क्रीडा महोत्सव PCET च्या मान्यवर मार्गदर्शक आणि विश्वस्तांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. या यशस्वी आयोजनामध्ये PCU कुलपती श्री. हर्षवर्धन पाटील, PCET अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पी. लांडगे, उपाध्यक्षा सौ. पद्मा एम. भोसले, खजिनदार श्री. शांताराम डी. गराडे, सचिव श्री. विठ्ठल एस. कळभोर, व्यवस्थापन प्रतिनिधी श्री. अजींक्य कळभोर आणि श्री. नरेंद्र लांडगे तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांचे मोलाचे योगदान लाभले.
‘क्रीडारंभ 2025’ च्या यशस्वी आयोजनाने PCU ने विद्यापीठातील क्रीडा संस्कृतीला अधिक बळकट केले आहे. विद्यापीठ भविष्यात ‘क्रीडारंभ’ अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी उत्सुक आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा व एकतेची भावना अधिक दृढ होईल.